व्हेज पुलाव
कधी कधी रोज वरण भात ,भाजी पोळी खायचा कंटाळा येतो , अश्या वेळेस घरात असलेल्या अगदी एक-दोन भाज्या टाकून पण हा पुलाव करता येतो. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे जण आवडीने खातील.
साहित्य :
१. बासमती तांदूळ – २ वाटी
२. चिरलेला श्रावण घेवडा,गाजर – पाव वाटी
३. कांदा – एक मोठा-लांब लांब चिरलेला
४. एक मूठभर पुदिन्याची पाने
५. एक मूठभर कोथिंबीर
६. लसणाच्या पाकळ्या – ५ ते ६
७. आलं – १/२”
८. हिरवी मिरची – २
९. तेजपत्ता – १
१०. काली मिरी – १० ते १२
११. दालचिनी – १”
१२. तिखट – १ टी स्पून किंव्हा आवडीप्रमाणे
१३. गरम मसाला – १/४ टी स्पून
१४. हळद – १/४ टी स्पून
१५. तेल – ४ टे स्पून
१६. मीठ – चवीनुसार
कृती :
सर्वप्रथम तांदूळ ३-४ पाण्याने स्वच्छ धुवून १५ मी भिजत ठेवावा. मिक्सरच्या भांड्यात पुदिना,कोथिंबीर,हिरवी मिरची,लसूण आणि आलं टाकून पाणी न टाकता वाटण तयार करून ठेवा. आता गॅस वर कुकर ठेवून त्यात तेल टाका , तेल चांगले गरम झाल्यावर त्यात तेजपत्ता,काली मिरी,दालचिनी टाकून कांदा टाकणे. कांदा गुलाबी रंग होईपर्यंत चांगला परतून घेणे. नंतर त्यात पुदिना कोथिंबीरीचे वाटण टाकून, आलं आणि लसणाचा कचेपण जाईपर्यंत चांगले परतून घ्या. हळद,तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. सगळा मसाला चांगला परतल्यावर चिरलेल्या भाज्या टाका. तांदुळमधील पाणी काढून तांदूळ भाज्यांबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून परतून घ्या. आता त्यात गरम केलेले चार वाट्या पाणी टाकून गरम मसाला टाका. कुकरचे झाकण लावून, शिट्टी ना लावता १० मी. माध्यम आचेवर पुलाव शिजवून घ्या.
तयार झालेला गरम पुलाव टमाटा-काकडी किंव्हा बुंदीच्या रायत्यासोबत वाढा. एकदम चविष्ट आणि झटपट तयार होतो हा पुलाव