तोंडलीची भाजी
तोंडली बऱ्याच मुलं -मुलींना आवडत नाही. तोंडलीची भाजी म्हंटली कि नाकं मुरडली जातात ! पण मी जी पध्दत आज सांगणार आहे ,त्या पद्धतीने केली तर नक्कीच मुलं काय मोठी माणसे पण बोटं चाटत खातील.
साहित्य:
१. तोंडली – एक पाव (शक्यतो लहान घ्या)
२. कांदा – एक मध्यम आकाराचा
३. दाण्याचा कूट – १ टे स्पून
४. आलं -लसूण पेस्ट – १ टी स्पून
५. तेल – १ टे स्पून
६. तिखट – १/२ टी स्पून
७. काळा मसाला – १ टी स्पून
८. धणे पावडर – १/२ टी स्पून
९. हळद -१/४ टी स्पून
१०. मोहरी-जिरं – फोडणीसाठी
११. मीठ – चवीनुसार
१२. कोथिंबीर
कृती:
सर्व प्रथम तोंडली स्वच्छ धुवून पुसून घ्या. सुरीने सगळ्या तोंडली फक्त मध्ये एक चीर मारून घ्या. कांदा बारीक चिरून घेणे . आता कढई मध्ये तेल टाका. तेल चांगले तापल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकून, ते चांगले तडतडल्यावर त्यात कांदा टाका . कांदा चांगला लाल रंगावर झाला कि लसूण-आलं पेस्ट टाकून एकजीव करून घ्या. नंतर त्यात हळद, तिखट, काळा मसाला आणि धणे पावडर टाकून चांगले परतून घ्या. १ ते २ मी. परतल्यावर त्यात तोंडली टाकून घ्या.मीठ टाकून भाजी शिजण्यापुरता थोडे गरम पाणी टाका. आता दाण्याचा कूट टाकून,झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या. ह्या भाजीला पातळ रस्सा नाही करायचा. दाटसर,अंगी रस्सा असतो. भाजी शिजली कि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या.
प्रेशर कुकर मधेही अगदी दोन-तीन शिट्टी मध्ये भाजी छान होते. सकाळी घाईच्या वेळेस ऑफिसच्या डब्यासाठी झटपट तयार होते.
टीप : काही जण काळा मसाला तयार करताना त्यात लाल मिरची नाही टाकत, त्यामुळे भाजी करताना आपल्या चवीनुसार तिखट आणि मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.