शेवयांचा उपमा
नाष्ट्याला नेहमीच आपण रव्याचा उपमा,पोहे असे झटपट होणारे पदार्थ करतो. आज शेवयांचा पटकन तयार उपमा कसा तयार करायचा ते बघू. मुलांच्या टिफिनसाठी पण देता येईल. दक्षिण भारतात ह्या प्रकारचा हा शेवयांचा उपमा करतात
साहित्य:
१. शेवया – १ वाटी
२. कांदा – १ मध्यम आकाराचा , बारीक चिरलेला
३. हिरव्या मिरच्या – २-३
४. कढीपत्ता – १०-१२ पाने
५. मोहरी – फोडणीसाठी
६. उडद डाळ – १/२ टी स्पून
७. ओल्या नारळाचा किस – २ टे स्पून
८. तेल – फोडणीसाठी
९. मीठ – चवीनुसार
१०. साखर – चिमूटभर
कृती :
सर्वप्रथम कढई मध्ये तेल गरम घ्या. आता त्यात मोहरी टाकून ती चांगली तडतडली कि त्यात उडदाची डाळ टाका . डाळ थोडी गुलाबी रंगावर आल्यावर त्यात कांदा,मिरची,आणि कढीपत्ता टाकून चांगले परतून घ्या. चिमूटभर साखर टाका. साखर टाकल्याने कांदा लवकर लाल होतो आणि उपम्याला चव पण छान येते. कांदा थोडासा लालसर झाल्यावर त्यात २ वाट्या गरम पाणी टाका. पाण्याला उकळी यायला लागल्यावर त्यात शेवया आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले हलवून कढईवर झाकण ठेवा. गॅस माध्यम आचेवरच ठेवा.थोड्या वेळाने शेवया शिजत आल्या आणि पाणी कमी झाले की त्यात ओल्या नारळाचा किस टाका. (ओलं नारळ नसले तर साधा खोबऱ्याचा किस किंव्हा बाजारात जो तयार बारीक किस मिळतो , तो टाकला तरी चालेल). नारळ टाकून चांगले एकजीव करून कमी गॅस वर एक वाफ काढून घ्या.
असा हा तयार झालेला गरम गरम उपमा नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा !