पिठलं
साहित्य :
१. डाळीचे पीठ – १ वाटी
२. लसूण – ८-१० पाकळ्या
३. हिरवी मिरची – २ ते ३ (किंव्हा आवडीनुसार, शक्यतो थोडी जाड कमी तिखट मिरची वापरावी )
४. हिंग – पाव चमचा
५. फोडणीसाठी, तेल,मोहरी आणि जिरं
६. हळद – पाव चमचा
७. मीठ – चवी नुसार
८. बारीक चिरलेली कोथिंबीर – मूठभर
कृती:
प्रथम एका कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा. एका बाजूला पाणी गरम करायला ठेवा.
लसूण पाकळ्या जाडसर ठेचून घ्या, मिरचीचे साधारण माध्यम आकाराचे तुकडे करून घेणे. आता तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरं टाका, ते चांगले तडतडल्यावर त्यात हिंग,जाडसर वाटलेला लसूण आणि मिरचीचे तुकडे टाकून चांगले हलवल्यानंतर हळद टाकून,त्यात थोडे पाणी टाका.पाण्याला उकळी आल्यावर त्यात हळूहळू डाळीचे पिठ टाका. पिठ टाकताना सतत हलवत राहणे, जेणे करून पिठाच्या जाड गुठळ्या नाही होणार. (ह्या प्रकारच्या पिठल्यात थोड्या गुठळ्या होतातच , पाण्यात घोळून टाकले तर नाही राहत. तुम्हाला जसे आवडेल तसे करा. )
मीठ टाकून, पिठलं घट्ट, पातळ जसे हवे त्या प्रमाणात गरम पाणी टाकून, झाकण ठेवून पिठलं कमी गॅसवर वाफायला ठेवा. पिठलं जेव्हा चांगले वाफते,तेव्हा तेल वरती येते. तेल वरती येणे ही पिठलं चांगल्या प्रकारे शिजले गेले आहे याची खूण आहे.
बारीक चरलेली कोथिंबीर टाकून, गरम गरम पिठलं , भाकरी किव्हा चपाती , भात, आणि कांदा ह्याबरोबर अप्रतिम लागते !