मखाना लाडू
मखनामध्ये विविध जीवनसत्त्वे तसेच खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. मखाना हे अतिशय आरोग्यदायी ड्रायफ्रूट आहे.मखान्याच्या सेवनाने पोटाचे आजार दूर होतात तसेच पचनसंस्था सुधारते. मखाना मध्ये अँटिऑक्सिडेन्टहि भरपूर असते. असे हे गुणकारी मखाना आणि इतर सुका मेवा वापरून बिना साखरेचे लाडू कसे तयार करायचे ते आज आपण बघूत. ह्या लाडूमध्ये लाल भोपळ्याच्या बिया पण आहेत. ह्या बियांमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ आणि झिंक असते.
मखाना लाडू
साहित्य :
१. मखाना – १०० ग्रॅम
२. काजू – ५० ग्रॅम
३. बदाम – ५० ग्रॅम
४. खरबूज बी – ५० ग्रॅम
५. लाल भोपळ्याची बी – ५० ग्रॅम
६. खजूर – १० ते १२
७. खसखस – १० ग्रॅम
८. खोबऱ्याचा किस – ५० ग्रॅम
९. गूळ (पावडर किंव्हा किसलेला )- १०० ग्रॅम
१०. साजूक तूप – ५० ग्रॅम
कृती :
गॅस वर कढई ठेवून त्यात १ टी स्पून तूप टाकून सर्वप्रथम मखाने मध्यम आचेवर चांगले भाजून घ्या. भाजताना मखान्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घेणे.
हाताने दाबून बघितल्यास जर तुटला तर समजावे की मखाना चांगला भाजला गेला आहे. भाजलेले मखाने थंड होण्यासाठी काढून ठेवा. आता त्याच कढई मध्ये एकेक करून सगळा सुका मेवा भाजून घ्या. खजुराच्या बिया काढून ते पण थोडे परतून घ्या. खोबरे खूप लाल होऊ देऊ नये. सगळे पदार्थ चांगले थंड होऊ द्यावे.
मिक्सर च्या भांड्यात सर्वप्रथम मखाना चांगला बारीक करून एका पराती मध्ये काढून घ्या. त्यानंतर काजू ,बदाम, खरबूज बी, भोपळ्याची बी यांची पण चांगली पावडर करून घ्या. खोबरं हातानेच चांगले बारीक करून घेणे. खजूर पण मिक्सर मध्ये वेगळे वाटून घ्या. बारीक केलेले सगळे पदार्थ भाजलेली खसखस टाकून चांगले मिळवून घ्या.
मिळवलेले मिश्रण थोडा थोडा गूळ घालून परत एकदा मिक्सर मध्ये एकजीव करून घेणे. पातळ केलेले तूप टाकून मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
मुलांना किंव्हा मोठ्यांनाही मधल्या वेळेत काहीतरी पौष्टिक हवे असते , अशावेळी घरी केलेला बिना साखरेचा, कमी तुपाचा हा लाडू एकदम छान पर्याय आहे.